भारतीय क्रिकेट संघाने 2024 च्या T20 विश्वचषकाच्या सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. ग्रुप स्टेजमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 3 पैकी 3 सामन्यांमध्ये भारताने आयर्लंड, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि नंतर यजमान अमेरिकेचा पराभव केला आहे. तर आता पुढच्या टप्प्यात भारताचा सामना अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. अशातच आता टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
T20 विश्वचषक 2024 सुपर-8 च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतीय संघाला एकाच वेळी दोन मोठे धक्के बसले आहेत. वास्तविक, अतिरिक्त संरक्षित खेळाडूंपैकी शुभमन गिल आणि आवेश खान भारतात परतणार आहेत. या दोघांचाही मुख्य 15 मध्ये समावेश नसणार आहे.
आवेश आणि शुभमनचे पुनरागमन का होत आहे याबाबत सध्या कोणताही खुलासा झालेला नाही. पण कदाचित संघाला त्यांची गरज नसावी आणि त्यामुळे त्यांना भारतात परतण्यास सांगण्यात आले आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत दुजोराही देण्यात आलेला नाही.
उल्लेखनीय आहे की ही स्पर्धा लांबलचक असल्याने 15 सदस्यीय संघासह 4 राखीव खेळाडू बीसीसीआयने ठेवले होते. यामध्ये शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान आणि खलील अहमद यांची नावे बोर्डाने जाहीर केली आहेत.आता शुभमन आणि आवेश भारतात परतल्याची बातमी आहे पण रिंकू आणि खलील संघाशी जोडले जातील. जर कोणी जखमी झाले तर हे दोन खेळाडू थेट मुख्य-15 मध्ये प्रवेश करतील.