2012 मध्ये पुण्यात (Pune) साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपी मुनीब इक्बाल मेमन (Munib Iqbal Memon) याला अटक देखील करण्यात आली होती. तो 12 वर्ष तुरुंगात होता परंतु मात्र, आता त्याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शुक्रवारी न्यायालयाने त्याच्या जामीनाबाबतचा निर्णय दिला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाकडून हा निर्णय देण्यात आला आहे.
बंदी घातलेल्या इंडियन मुजाहिदीन संघटनेच्या दहशतवाद्याच्या कोठडीतील मृत्यूचा बदला घेण्यासाठी ऑगस्ट 2012 मध्ये पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटांचा कट रचल्याचा आणि त्याची अंमलबजावणी केल्याचा आरोप मुनीब इक्बाल मेमन याच्यावर आहे. 1 ऑगस्ट 2012 मध्ये पुण्यातील जंगली महाराज रोडवर 5 साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात दहशतवादविरोधी पथक, पुणे पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला होता.
11 वर्षांपासून हा खटला सुरू असून यावर सुनावणी वेळेत झाली नाही. 2023 मध्ये या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होणे अपेक्षित होते . मात्र तसे न घडल्यामुळे मुनीब इक्बाल मेमन याला अटकेत ठेवणे हे कलम 21 अंतर्गत येणाऱ्या मूलभूत हक्काचा भंग करण्यासारखे आहे असा युक्तिवाद मेमनचे वकील मुबीन सोलकर यांनी केला आणि उच्च न्यायालयाकडून मेमन याला जामीन मिळवून दिला.
“या प्रकरणात आजपर्यंत फक्त 8 साक्षीदारांचा जबाब घेण्यात आला आहे आणि त्यामुळे भविष्यात हा खटला पूर्ण होण्याची शक्यता धूसर असल्याचे म्हणत भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार जलद खटला चालवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार असून जमीन मंजूर केला जात आहे न्यायाधीशांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, विशेष न्यायालयाने मुनीब इक्बाल मेमनला जामीन देण्यास नकार दिला होता. मेमन याने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि मेमनचे वकील मुबीन सोलकर यांनी केलेल्या युक्तिवादामुळे उच्च न्यायालयाकडून मुनीब इक्बाल मेमन याला जामीन देण्यात आला आहे.