राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप कधी जाहीर होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागले होते. तसेच हिवाळी अधिवेशन हे बिनाखात्याच्या मंत्र्यांविना पार पडल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केलेली पाहायला मिळाली होती.यानंतर अखेर हिवाळी अधिवेशन महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झाले आहे.
यामध्ये गृहमंत्री पद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ठेवण्यात आले आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खाते देण्यात आले आहे.
यानंतर खातेवाटप झाल्यानंतर लगेचच महायुतीत पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण एका बाजूला कारण शिवसेना शिंदे गटाचे नेते, तथा मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, असा मोठा दावा केला आहे.तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अजित पवार महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते. पण अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांची पुणे पालकमंत्रीपदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्याऐवजी अजित पवार यांना पुणे पालकमंत्रीपद मिळाले होते . तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळाले होते.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर मंत्री भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात स्पर्धा असल्याचे सांगितले जात आहे. तर बीडमध्ये धनंजय मुंडे की पंकजा मुंडे पालकमंत्री होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट की अतुल सावे यापैकी कोणाच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडत्ये हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मात्र राज्याचे नवनिर्वाचित पर्यटन मंत्री तथा शिंदे गटातील नेते शंभूराज देसाई यांनी पालकमंत्रिपदावरून महायुतीत कोणतीही रस्सीखेच नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले आहेत की, “नुकतेच आमचे खातेवाटप पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसांत आम्हाला आमची खाती सुपूर्द केली जातील. आता आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या दोन दिवसांत मुंबईला जातील. तिथे एकत्र बसून चर्चा करतील. त्या चर्चेनंतर पालकमंत्रीपदांचे वाटप होईल”.