महाराष्ट्र, एक प्रगतशील आणि औद्योगिक दृष्ट्या संपन्न राज्य, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्याही अतिशय विविधतेने नटलेले आहे. मात्र, या विविधतेच्या अंगाखांद्यावर अधूनमधून धार्मिक दंगलीचे दाहक वादळ घोंगावत आले आहे. राज्याची पुरोगामी ओळख पाहता या दंगली चिंताजनक आहेत. अनेकदा यावरून राज्याचे राजकीय वातावरण देखील चांगलचे तापलेले अनेकदा दिसून आले आहे. राज्यकर्ते आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत असतात. पण फक्त राजकीय विषयच नाही तर या दंगलींच्या पार्श्वभूमीकडे पाहताना आपल्याला ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक घटकांचा देखील सखोल अभ्यास करावा लागतो.
ऐतिहासिक पार्श्वभूमी:
ब्रिटिश काळात इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती राबवून हिंदू-मुस्लिम समाजात दरी निर्माण केली.तसेच त्यांनी हिंदू-मुस्लिम समाजात द्वेष निर्माण करणारी धोरणे राबवली.त्याचा परिणाम पुढे दीर्घकाळ जाणवला. १९६० च्या दशकात नागपूर, मुंबई आणि औरंगाबादमध्ये (आजचे छ.संभाजीनगर) धार्मिक तणावाचे प्रसंग घडले होते. विशेषतः हिंदू-मुस्लिम संबंधांत उग्रतेची छाया जाणवू लागली. १९व्या शतकात हिंदू व मुस्लिम समाजात धार्मिक ओळख जागृत झाली. समाजसुधारणांबरोबरच धार्मिक संघटनांची निर्मिती झाली (जसे की आर्य समाज, मुस्लिम लीग).
राजकीय हस्तक्षेप आणि ध्रुवीकरण:
१९८०-९० च्या दशकात, महाराष्ट्रातील राजकारणात धार्मिक ओळख हा एक प्रभावशाली मुद्दा झाला. बाबरी मशीद पाडल्यानंतर १९९२-९३ मध्ये मुंबईमध्ये झालेली दंगल ही अत्यंत भयावह ठरली. यामध्ये सुमारे 900 लोक मरण पावले, हजारो लोक बेघर झाले. तर अनेक दुकाने, घरे, मशिदी, मंदिरे यांचे खूप नुकसान झाले.त्यानंतरच्या काळात अनेक छोट्या-मोठ्या घटना राज्यात घडल्या, ज्या केवळ स्थानिक कारणांमुळेच नव्हे तर राजकीय पक्षांच्या सत्तासंघर्षांमुळेही भडकल्या.
सामाजिक-आर्थिक कारणे:
धार्मिक दंगली केवळ धार्मिक मतभेदांमुळे होत नाहीत. बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, झोपडपट्ट्यांमधील दैन्यावस्था यामुळे समाजात असंतोष वाढतो, जो अनेकदा धार्मिक आधारावर व्यक्त होतो. याला जर राजकीय पाठींबा मिळाला, तर मग त्याचे रुपांतर दंगलीमध्ये होते.
माध्यमांची आणि सोशल मीडियाची भूमिका:
अफवा, चुकीची माहिती, आणि धार्मिक भावना भडकवणारे मेसेज हे सोशल मीडियावरून पसरतात, ज्यामुळे तणाव वाढतो. तर काही वेळा माध्यमांनी चुकीची माहिती पसरवून तणाव वाढवला आहे, तर काही वेळा त्यांनी खऱ्या घटनेला उजाळा देऊन समाजात समंजसपणा वाढवण्याचे काम केले आहे. सोशल मीडियाचा अलीकडील प्रभावदेखील दंगलींमध्ये निर्णायक ठरू शकतो.
वस्तुतः महाराष्ट्रात अनेक जातीय आणि धार्मिक दंगली घडल्या आहेत त्याविषयीची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत पण उदाहरणासाठी आपण 1970 च्या भिवंडी दंगलीविषयी थोडी माहिती जाणून घेऊयात.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हे शहर म्हणजे एक महत्त्वाचे यंत्रमाग उद्योगांचे केंद्र. इथे हिंदू व मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणावर राहतात.भिवंडीमढील यंत्रमाग उद्योगांमध्ये बहुतांश कामगार मुस्लिम तर मालक हिंदू होते.कामगार संघटनांमध्ये मुस्लिम वर्चस्व होते. त्यामुळे तणाव निर्माण होत होता. दिनांक 7 मे रोजी हिंदू संघटनांनी शिवजयंती रॅली काढण्याचे ठरवले होते. पण जेंव्हा रॅली मुस्लिमबहुल भागातून नेण्यात आली. तेंव्हा मुस्लिम समाजातील लोकांनी या विरोधात प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे स्थानिक राजकारणात दोन्ही समुदायांचा प्रभाव वाढत होता. त्यातच काही स्थानिक राजकारणी आणि धार्मिक नेत्यांनी परिस्थिती अधिक चिघळवली. त्यामुळे मोठी दंगल उसळली. या दंगलीत 400 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले,1000 हून अधिक जखमी झाले, शेकडो घरे आणि दुकाने जाळण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने दंगल नियंत्रणासाठी लष्कर पाचारण केले. शांतता समित्या स्थापन करण्यात आल्या. परंतु, दीर्घकालीन सामाजिक समेटाच्या दिशेने फारसे काही केले गेले नाही.
थोडक्यात भिवंडी दंगल ही केवळ धार्मिक दंगल नव्हती, तर ती आर्थिक, सामाजिक व राजकीय तणावांची स्फोटक परिणती होती. यामध्ये सरकार, पोलीस आणि राजकीय पक्षांची भूमिका तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात धार्मिक दंगलींचा इतिहास हा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटकांनी प्रेरित आहे. ह्या दंगली फक्त धर्मांधतेचा परिणाम नाहीत, तर व्यवस्थात्मक अपयशाचे आणि राजकीय हेतूंचेही प्रतिबिंब आहेत. आपण सर्वांनी मिळून समावेशकतेच्या दिशेने वाटचाल केली, तर धार्मिक तेढांचे हे सावट कमी करता येऊ शकते. दंगली होण्यामागे सामाजिक, राजकीय व आर्थिक घटकांसह आणखी कोणते घटक कारणीभूत आहेत ते आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत.
या सिरीजचा पुढचा भाग- भाग 3 आधुनिक काळात महाराष्ट्रात दंगली का घडतात?