नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अद्यापही नाशिकच्या जागेसाठी महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीये. या जागेसाठी शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे या जागेवरून छगन भुजबळांचे नावे चर्चेत आहे. तसेच भाजपचे स्थानिक पदाधिकारी देखील या जागेवर आपला दावा सांगत आहेत. तर हेमंत गोडसेंनी शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्या नावाची घोषणा लवकरच केली जाईल, असं आश्वासन त्यांना देण्यात आलं आहे. पण अजूनही या जागेवरून तिढा सुटलेला नाहीये. अशातच आज छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
“मी नाशिकमधून फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला फोन करून शिरूरमधून लढतो का असं विचारलं होतं”, असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला आहे. तर शिरूरमधून महायुतीचे आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आढळराव पाटील हे आधी शिवसेना शिंदे गटात होते. पण उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
“शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. जर मी शिरूरमधून निवडणूक लढवली तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती, असा त्यामागे हेतू होता”, असं छगन भुजबळांनी सांगितलं. “पण नाशिकची जागा सोडून जायचा प्रश्नच येत नाही”, असेही भुजबळ म्हणाले.