देशात लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. या आठवड्यात केंद्रीय निडवणूक अयोग्य निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच आचारसंहिता देखील लागू होण्याची शक्यता आहे. तसेच एनडीएने अब की बार ४०० पारचा नारा दिला आहे. त्यासाठी भाजपाने देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपा, काँग्रेस आणि इतर काही पक्षांनी आपली लोकसभेची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान महाराष्ट्रात देखील अजून महायुती आणि मविआ मधील जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाहीये. महायटीतील जागावाटप कधी पूर्ण होणार, कोणाला किती जागा मिळणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. दरम्यान आज कॅबिनेट मिटिंग झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तातडीने दिल्लीला जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. जागावाटपासंदर्भात दिल्लीत म्हत्वाची बैठक होण्याची शक्यता वर्तविली आहे.
राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. त्यामध्ये भाजपा, शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर घटकपक्ष यांचा समावेश आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी अद्याप त्याची घोषणा झालेली नाही, असे महायुती आघाडीकडून बोलले जात आहे. प्रत्येक पक्षाने लोकसभा निवडणूक अधिक जागांवर लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशा स्थितीत जागावाटप अंतिम होण्यास वेळ लागत आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होत आहे. बैठकीत सर्वोच्च नेतृत्व महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, हरियाणा आणि बिहारमधील मित्रपक्षांशी जागावाटपावर चर्चा करणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी उर्वरित उमेदवारांच्या नावांवर विचारमंथन होणार आहे. लोकसभेच्या सुमारे १५० उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी मंगळवारपर्यंत येऊ शकते. १२ तारखेपासून गृहमंत्री अमित शाह मिशन दक्षिण अंतर्गत तेलंगणा दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान महायुतीचे ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याचे काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते. तसेच प्रत्येकाला सन्मानजनक जागा मिळतील असे अजित पवार देखील म्हणाले होते.