लोकसभा निवडून जवळ आली असली तरीही अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला दिसत नाहीये. अनेक जागांवरील तिढा सोडवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरूच आहे. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काही जागांवरून खलबते झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मध्यरात्रीपर्यंत ही बैठक सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, पालघर या जागांबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते आहे. लवकरच या जागांवरचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर फडणवीस आणि शिंदे यांच्यात अडीच ते तीन तास बैठक झाल्याचे समजते आहे. दोन्ही नेत्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर या जागांवरून चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाचा उमेदवार दिली जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये नारायण राणे हे भाजपाकडून तर किरण सामंत हे शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. दरम्यान किरण सामंत हे मंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत. पालघरमध्ये राजेंद्र गावित हे भाजपाच्या चिन्हावरनिवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे समजत आहे. त्यामुळे महायुतीमधील उर्वरित जागांचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.