Mumbai: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अलीकडेच झालेल्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी या हल्ल्याला “धर्म आणि अधर्म” यांच्यातील लढाई असे म्हटले आणि भारतीयांनी एकत्र येण्याचे महत्व अधोरेखित केले आहे.
मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की, हल्लेखोरांनी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारून त्यांची हत्या केली हे अत्यंत निंदनीय आहे. ते पुढे म्हणाले की, आपला देश शक्तिशाली आहे हे दाखवण्याची ही वेळ आहे. “जर आपण सर्वजण एकत्र आलो, तर कोणालाही आपल्यावर वाईट नजरेने पाहायची हिंमत होणार नाही. आणि कोणी जर तसे केले, तर त्याचे डोळे फोडले जातील,” असे ते म्हणाले आहेत.
भागवत यांनी स्पष्ट केले की, आपला स्वभाव कुणाचा द्वेष करणारा नाही, पण अन्याय सहन करणारा देखील नाही. त्यांनी उदाहरण दिले की, रावण हा शिवभक्त होता, पण चुकीच्या गोष्टी करत असल्याने भगवान रामांनी त्याचा अंत केला.
“काही लोकांना समजावून सांगून उपयोग होत नाही, त्यांना थेट धडा शिकवावा लागतो,” असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. शेवटी, त्यांनी हेही म्हटले की, खऱ्या अहिंसेसाठीही ताकद लागते आणि वेळ आली तर ती ताकद दिसायला हवी. वस्तूतः भागवत यांनी देशप्रेम, सुरक्षा आणि धर्म यावर बोलून लोकांमध्ये एकतेचा संदेश रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जनतेमध्ये राष्ट्राभिमान जागृत होण्यास नक्कीच मदत होणार आहे.