Keypoints
1. स्वामी विवेकानंदांचा जन्म आणि बालपण
2 . स्वामी रामकृष्ण परमहंसांशी भेट
3 देशभरात भ्रमण .
4 शिकागोमधील ऐतिहासिक भाषणानंतर, स्वामीजींना जगभरातून भाषणे आणि मार्गदर्शनासाठी आमंत्रणे येऊ लागली.
5 . विविध धार्मिक परिषदांमध्ये सहभागी होऊन त्यांनी जगभरात सनातन धर्माचा झेंडा उंचावला.
6 १८९७ मध्ये, स्वामीजींनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.
7 . ४ जुलै १९०२ रोजी, स्वामीजी अनंतात विलीन झाले.
“भारतातील विखुरलेल्या आध्यात्मिक शक्तींचं एकत्रिकरण हीच राष्ट्रीय एकता आहे. त्यामुळे ज्यांच्या हृदयाची धडधड एकाच आध्यात्मिक लयीत स्पंदित होते अशा सर्वांचे संघटन राष्ट्र म्हणून भारताने करायला हवे.”
सत्व, ज्ञान आणि समर्पणाच्या बळावर विश्वाला भारतीय संस्कृती आणि अध्यात्माची ओळख करून देणाऱ्या चिरतरुण स्वामी विवेकानंद यांचा हा संदेश प्रत्येक युगात प्रासंगिक आणि उपयोगी असेल.
महात्मा बुद्धांचे ज्ञान, करुणा आणि अहिंसेचे दर्शन, आद्य शंकराचार्यांकडून सनातन धर्माची पुनर्स्थापना आणि गोरखनाथांच्या शिष्यांनी मुघल आक्रमकांचा विरोध करून सांस्कृतिक एकतेसाठी प्रयत्न करणे स्वामीजींच्या याच विचारांना पुष्टि देतात.
रामानुजाचार्य, रामानंदाचार्य, शंकरदेव, चैतन्य महाप्रभू, ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यापर्यंत आलेल्या ज्ञानपरंपरेत जगद्गुरू शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंद असे दोन दीपस्तंभ आहेत ज्यांच्यापैकी एकाने देशात सनातन धर्माची पुनर्स्थापना केली तर दुसऱ्याने जागतिक पटलावर आपल्या अफाट तर्कबुद्धीने सप्रमाण हिंदू धर्माची प्रतिष्ठा उंचावली.
११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो इथं झालेल्या धर्मसंसदेतील हिंदू धर्माची प्रासंगिकता या विषयावर झालेलं स्वामीजींचं भाषण पाश्चात्य देशांमधील त्यांच्या दिग्विजयाचा पुरावाच आहे.
जगभरात हिंदुत्वाची पुनर्स्थापना करणाऱ्या चिरतरुण स्वामी विवेकानंदांनी गहन साधना, ज्ञानार्जन, त्याग आणि पराक्रमाच्या बळावर इतिहासात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे.
स्वामी विवेकानंद एक योद्धा संन्यासी, विलक्षण संत, हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, युगद्रष्टे आणि महान विचारवंत होते.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी स्वामी विवेकानंदांविषयी लिहिलं आहे की, “तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल तर विवेकानंदांचा अभ्यास करा. त्यांच्यात सर्वकाही सकारात्मक आहे, नकारात्मक काहीच नाही.”
स्वामी विवेकानंदांचा जन्म आणि बालपण
नरेंद्रनाथ दत्त अर्थात नरेन या नावाने ओळखले जाणाऱ्या विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कलकत्त्यात वडिल विश्वनाथ दत्त आणि आई भुवनेश्वरी देवी यांच्या पोटी झाला.
साधु संन्याशांबद्दल लहानपणापासूनच नरेंद्रला कुतुहल होतं आणि एक प्रकारे त्यांच्याकडे ओढा होता. सृष्टिची गूढता आणि तिचं रहस्य समजून घेण्यासाठी त्याचं बालमन सदैव आतुर असायचं. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान त्यांनी विज्ञानाबरोबरच पाश्चात्य ग्रंथांचंही अध्ययन केलं. लहान नरेंद्रमधील कुतुहलानं त्यांच्यातील जिज्ञासा वाढली आणि परिणामी भारतीय प्राच्यविद्यांबरोबरच अनेक आधुनिक विषय आणि पाश्चात्य साहित्यावर त्यांची पकड मजबूत झाली.
स्वामी रामकृष्ण परमहंसांशी भेट
आधुनिक ज्ञान-विज्ञानापासून ते पाश्चात्य ज्ञानाची पुरेशी माहिती असणाऱ्या नरेंद्र यांचं खरं लक्ष्य होतं ईश्वराचा शोध. याच शोधात निघालेल्या नरेंद्र यांना काली मातेचे अनन्य भक्त स्वामी रामकृष्ण परमहंस भेटले. निर्मळ भाव असणाऱ्या या दोघांमध्ये साहजिकच आत्मीयता वाढली. नरेद्रांनी विचारलं, महाराज तुम्ही ईश्वर पाहिला आहे का. रामकृष्णांनी उत्तर दिलं होय, मी ईश्वराला असं पाहिलंय जसं मी आत्ता इथं तुला पाहतोय.
शिष्य नरेंद्राचं ईश्वराप्रती इतकं अधिक आकर्षण गुरू रामकृष्ण परमहंसांना खूप आनंदित करत होतं. पण ईश्वराच्या सान्निध्यासाठी आतूर असलेल्या विवेकानंदांना त्यांनी वैराग्य न धारण करण्याविषयी सांगितलं, जे स्वामी विवेकानंदांनी स्वीकारलं.
१८८४ मध्ये नरेंद्रांनी पदवीपर्यंतचं शिक्षण केलं. मात्र दुर्दैवानं त्याच सुमारास त्यांच्या वडिलांचं निधन झालं. आपल्या घराची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी नरेंद्रांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. मात्र त्याही परिस्थितीत अध्यापनाचं कार्य करत असताना ईश्वराप्रती त्यांची श्रद्धा आणि ईश्वरप्राप्तीसाठीची त्यांची ओढ तसूभरही कमी झाली नाही.
गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या महासमाधीनंतर त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून चालण्याची, त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची जबाबदारी आता स्वामी विवेकानंदांवर आली होती.
देशभरात भ्रमण
आपल्या गुरुबंधूंना स्वामीजींनी धीर दिला. त्यांचं नेतृत्व करत स्वामीजींनी संपूर्ण देशभर प्रवास केला. साधु-संतांची सेवा, जप-तप, वेदान्ताचा प्रचार, धार्मिक चर्चा अशा अनेक गोष्टींना त्यांनी प्रोत्साहन दिलं. आणि हळूहळू देशभर त्यांची ख्याती पसरू लागली.
स्वामीजींनी संपूर्ण देशभर भ्रमण करून भारतीयांमध्ये क्षेत्र आणि भाषेच्या सीमा ओलांडून सांस्कृतिक आणि आध्यात्मिक रुपानं एक होण्याची भावना जागवली. आणि यामध्ये ते पूर्णपणे यशस्वी झाले.
अमेरिकेत असताना स्वामीजींनी भारतीयांबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या अपप्रचाराला आपल्या तर्कबुद्धीने खोडून काढलं आणि अमेरिकी जनतेच्या मनात घर केलं.
अमेरिकेतील सेवियर दाम्पत्य, गुडविन दाम्पत्य किंवा अन्य पाश्चात्य देशांशी संबंधित क्रिस्टाईन आणि मार्गारेट नोबेल (भगिनी निवेदिता) हे केवळ विवेकानंदांचे शिष्य बनले असं नाही तर त्यांनी हिंदू धर्माचा देखील स्वीकार केला.
जगभरात सनातन धर्माचा झेंडा उंचावला
शिकागोमधील ऐतिहासिक भाषणानंतर स्वामीजींना जगभरातून ठिकठिकाणी भाषणांसाठी, मार्गदर्शनासाठी बोलावणं येवू लागलं. निरनिराळ्या धर्म संमेलनांमध्ये सहभागी होऊन त्यांनी सनातन धर्माची पताका जगभरात फडकवली.
आपल्या सेवाकार्यांच्या विस्तारासाठी १८९७ मध्ये स्वामीजींनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. उठा, जागे व्हा आणि आपलं लक्ष्य साध्य केल्याशिवाय थांबू नका – या प्रेरक मंत्राचा त्यांनी उद्घोष केला.
मरगळ आलेल्या हिंदू धर्मीयांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी घोषणा दिली – गर्व से कहो, हम हिंदू है. त्याच बरोबर त्यांनी हे ही सांगितलं की – तुम्ही साहसी बना, तरच तुम्हाला स्वतःला हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार आहे.
स्वामीजी अनंतात विलीन झाले
सततचा प्रवास, भाषणं, निरनिराळे पाठ-प्रवचनं, अखंड साधना, अथक परिश्रम आणि विश्रांतीचा अभाव यांमुळं स्वामीजींचं शरीर क्षीण व्हायला लागलं. विश्रांतीसाठी ते हिमालयातल्या काही गावांमध्ये गेले. पण अखेर ४ जुलै १९०२ या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. स्वामीजी अनंतात विलीन झाले.
१८९६ मध्ये लंडनमध्ये असताना स्वामी विवेकानंदांनी एरिक हेमंड यांना जे सांगितलं होतं त्यातून त्यांचं अमरत्व आणि शाश्वत विचार अधोरेखित होतात. ते म्हणाले होते – “कदाचित फाटकी वस्त्रं आपण फेकून देतो त्याप्रमाणे मी माझं शरीरही एके दिवशी असंच काढून फेकून देईन … या शरीराचा त्याग करेन. पण त्यामुळे माझं काम थांबणार नाही. मी सर्वत्र लोकांना तोपर्यंत प्रेरित करत राहीन जोपर्यंत विश्वाला हे समजणार नाही की ते ईश्वराशी एकरूप आहे.”