Maharashtra Agriculture Day: १ जुलै रोजी राज्यात महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रात कृषी दिनाला विशेष असे महत्त्व आहे. १९८९ पासून महाराष्ट्राचे पहिले शेतकरी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘कृषी दिन” साजरा करण्यात येतो. कृषी दिनाचे औचित्य साधून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा या दिवशी सन्मान केला जातो. तसेच या निमित्ताने 1 जुलै ते 7 जुलै या आठवड्याभराच्या काळात ‘कृषी सप्ताह’ साजरा केला जातो. या कृषी सप्ताहमध्ये शेती संबंधित नवीन तंत्रज्ञान, आधुनिक उपकरणे आणि बियाणे यांचे प्रदर्शन आयोजित केले जाते. तसेच कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली जातात, तसेच राज्यभरात कृषी स्पर्धांचे आयोजन केले जाते. एकंदरित कृषी सप्ताहमध्ये शेतीविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आज आपण महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील शेतीचा आढावा घेऊयात.
महाराष्ट्रातील शेतीचे प्रकार: (Types of agriculture in Maharashtra)
-महाराष्ट्राच्या जनेतसाठी शेती हा एक प्रमुख आर्थिक आणि सामाजिक घटक आहे. महाराष्ट्रात बागायती शेती, जिराईत शेती, फळबाग शेती असे शेतीची प्रकार आढळून येतात.
– राज्यात ज्या भागात सिंचनाची सोय नाही, तिथे जिराईत शेती केली जाते. जिरायती शेतीत ज्वारी, बाजरी, मका अशी पिके घेतली जातात.
-महाराष्ट्रात फळबाग शेतीला विशेष महत्त्व आहे. कोकणातील पर्जन्यमान पाहता कोकणात आंबा, नारळ, काजू, सुपारी इत्यादी फळ पिकांना पोषक हवामान असते. तर महाराष्ट्राच्या पठारी भागात लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखी फळ पिके घेतली जातात. कोरड्या हवामानात पाण्याची उपलब्धता असेल तर द्राक्षासारखी फळ पिके घेतली जातात.
-याशिवाय, महाराष्ट्रात कापूस, सोयाबी, तूर, कांदे तांदूळ, गहू, डाळी, तेलबिया,आणि इतर काही पिके घेतली जातात.
महाराष्ट्रातील शेतीची वैशिष्ट्ये: (Characteristics of agriculture in Maharashtra)
-महाराष्ट्रातील शेतीची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे ‘महाराष्ट्राची शेती’ राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. अर्थातच महाराष्ट्रात शेती आणि शेती संबंधित उद्योग मिळून राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एकूण जीडीपीपैकी सुमारे 11 टक्के वाटा राज्याच्या कृषी क्षेत्राचा आहे.
-ठिबक सिंचनाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे, कारण राज्यातील ६० टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे.
-देशातील बियाणे उद्योगाची सुमारे ४० टक्के उलाढाल एकट्या महाराष्ट्रात होते
-महाराष्ट्र हा फुलशेती उत्पादनामध्ये सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या राज्यांपेकी एक आहे. राज्यातील ४००० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र विविध फुलांनी व्यापलेले आहे. यामध्ये गुलाब, जरबेरा, निशिगंध, केवडा, झेंडू इत्यांदी फुलांच्या फुलशेतीचा समावेश आहे
– महाराष्ट्र हे कोरडवाहू शेती तंत्रज्ञान विकसित करणारे पहिले राज्य ठरले आहे.
-महाराष्ट्रात अनेक मोठी कृषी विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांमध्ये शेतीविषयी विविध संशोधन केले जाते.
– कोकणात पिकणाऱ्या ‘हापूस’ आंब्याचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नाव आहे.
– देशातील एकूण कांद्यांपैकी ६३ टक्के कांदा, ७५ टक्के केळी, ७५ टक्के संत्रा, ४२ टक्के टाॅमेटो,९० टक्के हापूस आंबा हा एकट्या महाराष्ट्रातील असतो, अशी आकडेवारी उपलब्ध आहे आणि ही नक्कीच महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
महाराष्ट्राच्या शेतीची नवी दिशा:
महाराष्ट्रातील शेतकरी एक पाऊल पुढे टाकत उत्पन्न आणि उत्पादकता वाढविण्यासाठी पारंपारिक शेतीऐवजी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहेत. शेतकरी आता एकमेकांचा अनुभव शेअर करत शेतीच्या विविध पद्धती जाणून घेत आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतकरी ड्रॅगन फ्रूट, सफरचंदाची शेतीसुद्धा करू लागले आहेत.आता शेतकरी अगदी पेरणीपूर्वीच्या तयारीपासून ते पिक विकण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ही नियोजनपूर्वक करत आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात उत्पादन क्षमता वाढली आहे शिवाय शेतीचा खर्च कमी होऊन ती अधिक सक्षम झाली आहे. तसेच आता तर एआयचे शेतीमधील महत्त्व लक्षात घेता राज्यातील कृषी विद्यापीठे आणि शेतीशी निगडित संशोधन संस्थांनी एआयचा शेतीमध्ये वापर यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या शेतीला आता एक नवीन दिशी मिळाली आहे.
फडणवीस सरकारचे शेतीसाठी क्रांतिकारी पाऊल:
राज्य सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील ‘एआय’चा वापर आणि अन्य प्रगत तंत्रज्ञानाच्या विकसनासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
-फडणवीस सरकारने नुकताच आयआयटी- मुंबईसोबत सामंजस्य करार करुन आणि त्याद्वारे अर्थसहाय्य देऊन ‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’ हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पाद्वारे कृषीसाठी पूरक असे एआय आधारित ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्याविषयी संशोधन सुरू आहे.
-महायुती सरकाने गतवर्षी सोयाबीन आणि कापूस पिकासाठी हमीभाव जाहीर केला आहे.
दरम्यान, भाजप सरकारने शेतीत एआयचा वापर करण्यासाठी घेतलेला पुढाकार राज्याच्या शेतीच्या विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारची मातीची माहिती उपलब्ध असणे, विविध कृषी-आधारित हवामान परिस्थिती शेतकऱ्यांना मिळत असल्याने, शेतीत तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने, सुविकसित दळणवळण सुविधा असल्याने, ठिबक सिंचनाचा वाढता कल, हरितगृह यामुळे आता राज्यातील शेती अगदी प्रगत होऊ लागली आहे हे स्पष्ट होते.