भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन ठेवल्याबद्दल आणि उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन वाझेला मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे.
सचिन वाझेने आपल्याला अटक करताना सरकारची मंजुरी न घेतल्याने अटक बेकायदा आहे. आणि म्हणून आपली सुटका करावी, अशी मागणी आपल्या याचिकेत केली होती. मात्र, आता त्याची ही याचिका फेटाळण्यात आली आहे.
या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने म्हंटले आहे की, सचिन वाझेला अटक करण्यात आली तेव्हा बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे त्याच्या अधिकृत क्षमतेनुसार काम करत नव्हते, त्यामुळे त्याला अटक करण्यासाठी राज्य सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही. असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी त्याच्या याचेकेवर दिला.
न्यायमूर्ती एस.व्ही. कोतवाल आणि एस.एम. मोडक यांच्या खंडपीठाने वाझेची याचिका फेटाळून लावली आहे. ज्यामध्ये राज्य सरकारकडून मंजुरी नसल्यामुळे त्याची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला होता.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गेल्या तीन वर्षांपासून सचिन वाझे तुरुंगात आहेत. काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपी जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळे सचिन वाझेने देखील तुरुंगातून बाहेर येण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्याच्या अर्जावर गुरुवारी सुनावणी पार पडली असून, न्यायालयाने त्याला दिलासा देण्यास नकार दिला आहे.