India Vs Pakistan: २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कडक कारवाई सुरू केली आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने पाकिस्तान विरोधात काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे भारताने पाकिस्तानसोबतच्या ‘सिंधू जल करारा’ला स्थगिती दिली आहे. परंतु पाकिस्तानने भारताच्या या निर्णयावर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी आक्रमक आणि चिथावणीखोर वक्तव्ये करत सिंधु करारच्या निर्णयावरुन भारताला धमकी दिली आहे. बिलावल भुट्टो झरदारी यांनी एक्सवरती पोस्ट करत लिहिले आहे की, “मला सिंधू नदीच्या काठावर उभे राहून भारताला सांगायचे आहे की, सिंधू आमची आहे आणि ती आमचीच राहील. एकतर आमचे पाणी या नदीतून वाहेल किंवा त्यांचे रक्त त्यातून वाहील.”
बिलावल भुट्टो झरदारी यांचे हे वक्तव्ये हे केवळ भडकावणारे नसून द्वेषजन्य आणि युद्धाची भाषा बोलणारे आहे, असे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खरेतर यापूर्वीही पाकिस्तानने म्हटले आहे की, भारताने सिंधू कराराला स्थगिती देणे, म्हणजे युद्ध छेडण्यासारखे आहे.
दरम्यान, १९६० मध्ये भारत पाकिस्तान यांच्यात पाणी वाटपावरून जो करार झाला त्याला सिंधू करार म्हणतात. या करारानुसार पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या म्हणजेच बियास, रावी आणि सतलज या नद्यांच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि वापराचे पूर्ण अधिकार भारताला देण्यात आले आहेत. तर पश्चिमेकडे वाहणाऱ्या सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि वापराचे अधिकार पाकिस्तानला देण्यात आले होते. आता भारताने सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.