Operation Sindoor: 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 2७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदू पुरूषांना टार्गेट केल्याने देशात संतापाची लाट उसळली होती. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला जावा, अशी भावना प्रत्येक भारतीयाची होती. या घटनेनंतर बिहारमधील हाजीपूर येथील अनेक महिलांनी एक विशेष प्रतिज्ञा केली होती.
जोपर्यंत हल्लेखोर दहशतवाद्यांचा सूड घेतला जात नाही, तोपर्यंत कपाळावर कुंकू लावणार नाही, अशी प्रतिज्ञा या महिलांनी घेतली होती. अखेर 7 मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास भारताने पाकिस्तानातील आणि पीओकेतील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत एअर स्ट्राईक केला आहे. त्यामुळे आज या महिलांचा संकल्प पूर्ण झाला आहे.
या कारवाईनंतर हाजीपूरच्या गांधी आश्रमातील महिलांनी एकमेकांना कुंकू लावून आनंद व्यक्त केला आहे. तसेच या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहे. तसेच या पत्रात त्यांनी लष्कराच्या पराक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक महत्त्वाचे अड्डे नष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे आज अनेक भारतीयांनी समाधानाचा श्वास घेतला आहे. तसेच या कारवाईमुळे पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांनाही कुठेतरी न्याय मिळाला, अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे.