पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, 26 एप्रिल 2025 रोजी नवी दिल्लीच्या साउथ ब्लॉकमध्ये भारताने आपली पहिली अधिकृत पत्रकार परिषद आयोजित केली. या दरम्यान जेंव्हा परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री पत्रकारांसमोर उभे राहिले, तेव्हा सभागृहात शांतता होती, पण त्यांच्या शब्दांमध्ये युद्धाचे संकेत स्पष्ट दिसत होते. ही केवळ पत्रकार परिषद नव्हती, तर एका सार्वभौम राष्ट्राच्या सहनशीलतेच्या सीमेचा अंत होता. “ही वेळ निषेधाची नव्हे, निर्णायक कृतीची आहे,” असा ठाम आणि भारदस्त संदेश देत मिस्री यांनी भारताच्या नव्या धोरणाची घोषणा केली. 30 मिनिटांच्या या पत्रकार परिषदेत ‘संयमाने सज्ज’ असा नवा मंत्र देण्यात आला आणि पाकिस्तानविरोधातील पाच ठोस निर्णयांनी पत्रकार मंडळींच्या लेखणीला धार मिळाली.
सुरुवातीचा राजनैतिक कडवटपणाचा सूर
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या या पत्रकार परिषदेत सिंधू जल करार तात्पुरता निलंबित, वाघा-अटारी सीमा बंद, पाकिस्तानसाठी व्हिसा रद्द, सल्लागारांची हकालपट्टी आणि राजनैतिक संबंधांचा दर्जा घसरवण्याचे निर्णय एकामागून एक जाहीर होत गेले. ही परिषदेची लय केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित नव्हती तर ती भारताच्या आत्मरक्षक स्वभावाच्या परिवर्तनाची साक्ष देत होती.
दुसरीकडे, इस्लामाबादमध्ये गोंधळ
याच पार्श्वभूमीवर 26 आणि 28 एप्रिल रोजी पाकिस्तानने आपली पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत, ‘आमचा यात काही सहभाग नाही’ असे ठामपणे सांगितले. पण हे स्पष्टीकरण त्यांच्या चेहऱ्यावरील अस्वस्थतेला लपवू शकलं नाही. त्यानंतर त्यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून हस्तक्षेपाची विनंती केली. इस्लामाबादमधील ही पत्रकार परिषद म्हणजे ‘राख झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न’ होता, ज्यात ना ठोस माहिती होती ना समाधानकारक उत्तरं.
ऑपरेशन सिंदूर: पत्रकार परिषदेतून सामरिक स्पष्टता
7 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, शब्द आणि कृती यांचा समन्वय असतो तेव्हाच राष्ट्र सुरक्षित राहतं. विंग कमांडर व्योमिका सिंग, कर्नल सोफिया कुरेशी आणि विक्रम मिस्री यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची सविस्तर माहिती देत भारताच्या कारवाईची पारदर्शकता जगासमोर मांडली. POK मधील एकूण 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले असून, यामध्ये 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी डेव्हिड हेडली आणि अजमल कसाबला जिथे ट्रेनिंग मिळाली, ते अड्डेही उध्वस्त केले. तसेच यामध्ये कोणतीही पाकिस्तानी लष्करी सुविधा लक्ष्य करण्यात आली नसल्याची माहितीही त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेदरम्यान सर्व हल्ल्याचे व्हिडिओ फुटेज आणि इमेज भारतीय विदेश मंत्रालयाकडून दाखवण्यात आले. ही पत्रकार परिषद म्हणजे केवळ सामरिक यश नव्हे, तर संवादातील स्पष्टतेचा आदर्श होता.
कर्नल सोफिया कुरेशींनी फाडला पाकिस्तानच्या खोट्या अजेंड्याचा बुरखा
आता या युद्धातून पाकिस्तानने माघार घेतल्याने शनिवार, १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. याविषयी पुढील बैठक ही १२ मे रोजी होणार आहे. या घोषणेनंतर, भारतीय सैन्याने पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण कारवाईची माहिती दिली. युद्धबंदीच्या घोषणेनंतर भारतीय सैन्याने म्हटले की, पाकिस्तानचे इतके नुकसान केले आहे की त्यांच्या हल्ल्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम झाला आहे. भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानचे कमांड कंट्रोल, लॉजिस्टिक्स, लष्करी पायाभूत सुविधा आणि त्यांच्या सैनिकांचे इतके नुकसान झाले की त्यांची संरक्षण आणि गोळीबार करण्याची शक्ती नष्ट झाली.
यानंतर कर्नल सोफिया कुरेशी यांनी तर पाकिस्तानच्या खोट्या अजेंड्याचा बुरखाच फाडला. लष्कराच्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, “पाकिस्तानने दावा केला होता की, त्यांनी त्यांच्या JF 17 ने भारताच्या S400 आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र तळांना नुकसान पोहोचवले, जे पूर्णपणे खोटे आहे. दुसरे म्हणजे, त्यांनी सिरसा, जम्मू, पठाणकोट, भटिंडा, नालिया आणि भूज येथील आमच्या हवाई तळांना नुकसान पोहोचल्याची चुकीची माहिती देणारी मोहीम देखील चालवली होती, हा दावाही पूर्णपणे खोटा आहे. पाकिस्तानने पसरवलेल्या माहितीनुसार, चंदीगड आणि व्यास येथील आमच्या दारूगोळा डेपोंना नुकसान पोहोचले, हे देखील पूर्णपणे खोटे असल्याची माहिती भारतीय सैन्याकडून देण्यात आली.
मंदिरांना आणि धार्मिक स्थळांना केले लक्ष्य
या पत्रकार परिषदेत पाकिस्तान वारंवार धार्मिक स्थळांवर हल्ले करत असल्याचे सांगण्यात आले. जम्मू मधील प्रसिद्ध शंभू मंदिर आणि रहिवाशी क्षेत्रांना टार्गेट करण्यात आल्याचे कुरेशी आणि सिंह यांनी सांगितले. अर्थात भारतीय सशस्त्र दलांनी हे हल्ले परतावून लावले. पाकिस्तानने शाळा आणि रुग्णालय परिसरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. तर काही भागातील भारतीय विमानतळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. आता अमेरिका आणि इतर बड्या देशांच्या मध्यस्थीमुळे युद्धविराम मान्य झाला असला, तरी भारताने पाकिस्तानकडून झालेल्या उल्लंघनाचे ठोस पुरावे सादर करत परिस्थितीचा तटस्थ आढावा दिला आहे. इथेही भारताची पत्रकार परिषद माहितीपूर्ण आणि संयमित होती हे दिसून येते. तर पाकिस्तानच्या प्रतिक्रिया अस्पष्ट आणि बचावात्मक होत्या.
पत्रकार परिषद म्हणजे केवळ माहिती नव्हे, भूमिका
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदांमधून भारताने आपली भूमिका, नीती आणि धोरणे यामध्ये ठामपणा दाखवला. या परिषदांमध्ये केवळ माहिती दिली गेली नाही, तर एक संदेशही दिला तो म्हणजे भारत आता शांत राहणार नाही, तो सज्ज आहे आणि उत्तर देण्यास सिद्ध आहे. दुसरीकडे, पाकिस्तानच्या पत्रकार परिषदांमधून दिशाभूल, असमंजसपणा आणि आंतरराष्ट्रीय सहानुभूती मिळवण्याचा व्यर्थ प्रयत्न दिसून आला.
शब्दांचे हे रण आता थांबले असले तरी, त्या प्रत्येक पत्रकार परिषदेतून उभ्या राहिलेल्या राजनैतिक आणि सामरिक खुणा अजूनही दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम करत आहेत.
➣ Wing Commander Vyomika Singh outlined Pakistan’s unprovoked attacks on civilian and defense infrastructure; confirmed successful neutralization by Indian Armed Forces and proportionate response causing significant damage to Pakistan military assets
WATCH📽️ @adgpi… pic.twitter.com/Tg1GcGpQEB
— PIB India (@PIB_India) May 10, 2025