Terrorsit Attack:पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला काळजाला सुन्न करणारा होता. या हल्ल्यामध्ये धर्म विचारून केवळ हिंदू पुरूषांना टार्गेट केल्याने भारतात दहशतवाद्यांविरूद्ध संतापाची लाट उसळली होती. भारत सरकारनेही ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. खरेतर भारत सरकारने दहशतवाद्यांविरूद्ध घेतलेली यावेळसची भूमिका तुलनेने अधिक आक्रमक दिसली. कारण यावेळी भारताने दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानविरोधातही अनेक कठोर निर्णय घेतले. त्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये युद्धही पेटले होते. त्यानंतर भारत पाकिस्तानने शस्त्रसंधी स्विकारली. परंतु भारताची दहशतवाद्यांविरोधातली कारवाई मात्र सुरूच आहे.
नुकत्याच झालेल्या दहशतवाद्यांविरोधातल्या मोहिमेत ६ दहशतवाद्यांचा खात्मा:
सध्या भारत पाकिस्तान संघर्ष निवळला असला तरी आता जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादा विरोधातली भारताची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. यावेळी भारतीय सैन्याने जम्मू काश्मीर पोलीसांच्या सहाय्याने गेल्या २४ तासांत दहशतवाद्यांविरोधात २ ऑपरेशन पार पाडली. यातील एक ऑपरेशन शोपियानमधील केलर परिसरात आणि दुसरे ऑपरेशन पुलवामाच्या त्रालमध्ये पार पाडण्यात आले. यामध्ये भारतीय सैन्याने तब्बल 6 दहशतवादी ठार केले आहेत.
भारतीय सैन्याने कसे पार पाडले दहशतवाद्यांविरोधातले ऑपरेशन:
या कारावाईबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जीओसी व्ही फोर्सचे मेजर जनरल धनंजय जोशी म्हणाले की, “पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनतर आम्ही काही परिसरांवर लक्ष ठेवून होतो. गुप्तचर संघटनेकडून आम्हाला वेळोवेळी माहिती मिळत होती. दहशतवाद्यांचे गट हे बर्फ वितळल्यानंतर जंगलात लपले आहेत, असे आम्हाला समजले होते. मिळालेल्या माहितीप्रमाणे आम्ही नियोजन करत होतो, त्यानुसार आम्ही उंच पर्वतांवरील जंगलांमध्ये सैन्य तैनात केले होते. शोपियानमधील केलर परिसरात 12 तारखेला रात्री एक दहशतवादी ग्रुप असू शकतो, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. तिथे आधीपासूनच जे सैनिक तैनात होते ते लक्ष ठेवून होते. त्यानंतर 13 मे रोजी सकाळी जेव्हा त्यांना काही संशयास्पद हालचाली आढळल्या, तेव्हा त्यांनी कारवाई केली. त्या ठिकाणी भारतीय सैनिक आणि दहशतवाद्यांसोबत चकमकदेखील झाली होती. परंतु यात भारतीय सैन्याने ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला.
-जनरल धनंजय जोशी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दुसरे ऑपरेशन त्राल भागातील सीमावर्ती गावात करण्यात आले. तिथेही दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय सैनिकांना मिळाली होती. त्यानंतर भारतीय सैनिकांनी त्या गावाला वेढा घातला. सैनिकांनी गावाला वेढा घातलेला पाहताच दहशतवाद्यांनी नागरी वस्तीतील घरांमध्ये लपण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय सैनिकांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारतीय सैनिकांनी ग्रामस्थांना वाचवण्यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले व त्यानंतर भारतीय सैनिकांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
ठार झालेल्या दहशतवादी कोण होते:
– भारतीय सैनिकांनी ठार मारलेल्या सहा दहशतावाद्यांपैकी एक शाहिद कुट्टे नावाचा दहशतवादी होता. तो एका जर्मन पर्यटकावरील हल्ल्यासह इतर दोन मोठ्या हल्ल्यांमध्ये सहभागी होता. तो दहशतवादी कारवायांसाठी निधी देखील पुरवत होता.
– तसेच पुलवामामध्ये ठार झालेले 3 दहशतवादी हे ‘जैश-ए-मोहम्मद’शी संबंधित होते. आसिफ अहमद शेख, अमीर नजीर वाणी आणि यावर अहमद भट अशी त्यांची नावे आहेत.
भारतीय लष्कराने जारी केलेली १४ दहशतवाद्यांची हिटलिस्ट:
भारतीय लष्कराने १४ दहशतवाद्यांची हिटलिस्ट जारी केली आहे. हे १४ ही दहशतवादी भारताविरोधात कारवाई करण्यात सक्रिय असतात. त्यातील ६ दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सैनिकाने कशाप्रकारे गेल्या २४ तासांत केला याची माहिती आपण पाहिली आहे. आता ‘लष्कर ए तोयएबा’चा दहशतावादी नसीर अहमद वाणी, आदिल डेंटो, हारिस नजीर, आमिर डार, जाकीर गणी सक्रिय आहेत. तसेच हिजबुल मुजाहिदीनचे आसिफ खांडे,जुबैर अहमद वानी, हारून रशीद गनी असे मिळून ८ दहशतवादी अजून सक्रिय आहेत. या आठ दहशतवाद्यांची शोधमोहिम सुरू असल्याचेही भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय सैनिकांनी ज्या प्रमाणे गेल्या २४ तासांत दुर्गम भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला, त्यावरून स्पष्ट होते की, दहशतवादी कुठेही लपले असले तरी त्यांना शोधून शोधून आम्ही मारू असा भारतीय सैनिकांनी निर्धार केला आहे. भारताने दहशतवादाविरोधात जी मोहीम सुरू केली आहे त्यामुळे दहशतवाद्यांच्या नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे. तसेच भारताच्या या मोहिमेमुळे आता दहशतवादी भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस सहजासहजी करणार नाहीत, हे तर निश्चितच.